ऑपरेशन टायगर सुरू असतानाच, भास्कर जाधवांचा बॉम्बगोळा! उद्धव सेनेच्या शिलेदाराच्या विधानाने एकच खळबळ

मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. एका मागून एक प्रवेश होतील. त्यात जुने सहकारी आपल्यासोबत येतील असा दावा त्यांनी केला होता. उद्धव सेनेला जेरीस आणण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यात राजन साळवी यांच्या प्रवेशाने पहिला धक्का देण्यात शिंदे गट यशस्वी ठरला. आता उद्धव सेनेचे खमके शिलेदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने दोन्ही गटाच्या भुवया उंचावल्या आहेत. क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव आहे, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले.

यापूर्वी पण त्यांनी विधानसभा, लोकसभेच्या प्रचारादरम्यान नाराजी व्यक्त केली होती. पण सध्या ऑपेरशन टायगर सुरू असतानाच जाधवांची ही प्रतिक्रिया उद्धव सेनेच्या पोटात गोळा आणणारी आहे.“बाळासाहेब असताना शिबिरांमधून भाषण करायची मला संधी मिळायची. बाळासाहेब मनोहर जोशींना सांगायचे या पोराला महाराष्ट्रात फिरवा. याला जर महाराष्ट्रात फिरवला तर तळागाळातला माणूस जोडला जाईल.

शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद मला लाभले त्यानंतर पवार साहेबांचे आशीर्वाद मला लाभले. महाराष्ट्रात माझा एक वर्ग आहे पण क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मला कधीही मिळाली नाही. माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवा आलं आहे.” चिपळूण येथे बोलताना त्यांनी मनातील सल बोलून दाखवली.