Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. त्यानिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले होते.

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. त्यानिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा झाला.देशभरात 395 व्या शिवजन्माचा उत्साह लोकांमध्ये दिसत असून किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला गेला. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे त्याठिकाणी गाभाऱ्यात फुलांचे आकर्षक सजावट करण्यात आली.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले. पारंपारिक वेशभूषेत, शिवरायांच्या नावाच्या घोषणा देत शिवभक्तांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.शिवनेरीवर नतमस्तक झाल्यानंतर एक प्रेरणा मिळते अशीच भावना शिवभक्त व्यक्त करत आहेत. आम्ही मराठी आहोत, शिवाजी महाराजांचा मला मनापासून आदर आणि अभिमान वाटतो, त्यामुळे आम्ही दरवर्षी न चुकता इथे येतो, अशी भावना एक शिवभक्त महिलेने व्यक्त केली.

किल्ले शिवनेरी वर दर वर्षी शिवभक्तांना गडाच्या पायथ्यावर सकाळी 7 नंतर प्रवेश रोखला जायचा यामुळे दरवर्षी अनेक शिवभक्त रोष व्यक्त करायचे. मात्र यावर्षी गडावर सर्व शिवभक्तांना प्रवेश दिला गेला. शासकीय कार्यक्रम होईपर्यंत शिवभक्तांना गडाच्या मध्यभागी रोखण्यात आले, तसेच त्यांना कार्यक्रम पाहता यावा यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली.यावेळी विविध साहसी खेळांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.