आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सांगोला तालुक्यात देखील अनेक विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. सांगोला तालुक्यातील मांजरी येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवप्रतिमेचे पूजन, गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप, जंगी कुस्त्यांचे नियोजन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन यासह व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवप्रेमी तरुण मंडळ मांजरी यांच्या वतीने देण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी मांजरी गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज बुधवार दिनांक १९ रोजी सकाळी आठ वाजता शिवप्रतिमेचे पूजन व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केले जाणार आहे. यासह सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचे मैदान भरवले जाणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी मोठे बक्षीस ठेवण्यात आले आहेत. तसेच गुरुवार दिनांक २० रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान ही भावना समजून, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासह शुक्रवार दिनांक २१ रोजी सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत समाजप्रबोधनकार डॉक्टर वसंत हंकारे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
आजची पिढी उद्याचं भविष्य, सुरक्षित मुलगी तर सुखी आई वडील या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यान कार्यक्रमासाठी न समजलेले आईबाप समजून घेण्याकरता अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान अल्पोपहाराची सोय करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे. सदरचे कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मांजरी पटांगणामध्ये होणार असल्याचे आयोजक शिवप्रेमी तरुण मंडळ मांजरी तालुका सांगोला यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.