विटा शहरात नुकतेच ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण होतेच त्यानंतर विटा पत्रकार हल्ल्यामुळे शहर आणखीनच हादरून गेले. विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी राहुल जाधव, सुनिल पवार, अभिषेक चंद्रकांत आदाटे आणि सचिन रामचंद्र तावरे (सर्व रा. विटा) या | चौघांना विटा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर ११ फेब्रुवारी रोजी कार्यालयात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यात पत्रकार पिसाळ गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अटक झालेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सागर चोथे आणि विनोद सावंत हे अद्याप फरार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.