पारंपारिक वेशभूषा, डॉल्बीचा दणदणाटाने वस्त्रनगरी झाली शिवमय…. शिवजयंतीला उत्साहाचे उधाण

काल सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. गावोगावी गल्लोगल्ली मिरवणूका काढण्यात आल्या. एकच उत्साह जल्लोष पहायला मिळाला. वस्त्रनगरीतही मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी मिरवणुका काढून, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून महाराजांना मानवंदना दिली. ढोल ताशांचा गजर आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, जय भवानी जय शिवाजीचा अखंड जयघोष अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध आणि अखंडपणे सुरु असलेला शिवरायांच्या जय जयकार अशा उत्साही वातावरणात इचलकरंजीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. तर सायंकाळी विविध मंडळाच्यावतीने शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.

मिरवणुकीमध्ये डॉल्बीच्या दणदणाटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. महानगरपालिकेच्या वतीने शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अति. आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कॉ. मलाबादे चौक येथील राज्याभिषेक सोहळा फलकास आणि छत्रपती शिवाजी उद्यान येथील अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी सहा. आयुक्त रोशनी गोडे, अशोक स्वामी, प्रकाश दत्तवाडे, तानाजी पोवार, बाळासाहेब कलागते, रवी रजपुते, सौ. मौश्मी आवाडे, पुंडलिकभाऊ जाधव, नरसिंह पारीक, आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी महानगरपालिका बालवाडी विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिव जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. तसेच महाराष्ट्र राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा गायन कार्यक्रम संपन्न झाला.

सायंकाळनंतर विविध मंडळांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी डॉल्बीच्या आवाजाने संपूर्ण परिसरात दणदणाट पसरला होता. शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध मंडळाच्यावतीने सायंकाळी श्री शिवतीर्थ येथून मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेकांनी पारंपारिक वेशभूषा, देखावे त्याचबरोबर डॉल्बी लावल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत मिरवणूका सुरु होत्या. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.