वाळवा तालुक्यातील कासेगावमध्ये शिवजयंती निमित्त आरमार प्रतिकृतीचे प्रदर्शन

काल सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांसह मिरवणुक काढण्यात आली. सर्वत्र एकच उत्साह जल्लोष पहायला मिळाला. वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे दर्यापती शिवराय आरमार प्रतिकृतींचे प्रदर्शनाचे १९ व २० फेब्रुवारी रोजी आयोजन पाटील युवाशक्ती व समस्त शिवप्रेमी ग्रुपच्या वतीने करण्यात आले, असल्याची माहिती ओमकार पाटील यांनी दिली. शिवकालीन आरमाराच्या माहितीचे हे प्रदर्शन आहे. यावर्षी मराठा आरमार प्रतिकृतींचे दोन दिवसीय प्रदर्शन कासेगाव ग्रामसचिवालय बाजारपेठ येथे भरवण्यात येणार आहे.

इतिहास अभ्यासक कुमार गुरव यांनी संग्रहित केलेल्या माहितीचा खजिना देखील मांडण्यात येणारआहे. सदर प्रदर्शनामध्ये इसवी सन १२०० ते २००० पर्यंतच्या आरमाराचा इतिहास मांडण्यात येणार आहे. विशेषतः शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या मराठा आरमारासह विविध प्रकारांच्या जहाजांची निर्मिती जलदुर्गांच्या छायाचित्रांसह माहिती लक्षवेधी ठरणार आहे. यामध्ये विशेष आकर्षण ३० फूट लांबीच्या मराठा आरमार नौकेची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. तसेच यावर्षीपासून सामाजिक, अध्यात्मिक, क्रीडा, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिंचा राजा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.