छत्रपती शिवाजी पूल ते तावडे हॉटेल एलिव्हेटेड उड्डाण पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश….

सध्या अनेक भागातील विकासकामे सुरु आहेत. तसेच अनेक कामांच्या पूर्ततेसाठी मागणी देखील केली जात आहे. अनेक ठिकाणी रस्ते, वाहतूक, पाणी यासंदर्भातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विमानतळ येथे घेतली. या बैठकीत कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शिवाजी पूल ते तावडे हॉटेल हा एलिव्हेटेड उड्डाण पुल तयार करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिले.

महापुरात बंद होणाऱ्या शिवाजी पूल ते केर्ली फाटा या रस्त्याचा आराखडा तयार करून रस्त्याची उंची वाढवणे, सहा ठिकाणी बॉक्स तयार करणे आदींचा समावेश करावा तसेच कोल्हापूर- रत्नागिरी महामार्ग कोल्हापूर, गगनबावडा मार्गाला जोडण्यासाठी बालिंगा ते आंबेवाडी या रस्त्याचा सर्व्हे करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

याबरोबरच पुणे-बेंगलोर महामार्गाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करा, तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. सांगली फाटा ते उचगाव हा पिलर पूल व कागल येथील उड्डाण पूल याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. या पिलर पुला सोबत बास्केट ब्रिजची उंची वाढवून त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही गडकरी यांनी दिल्या. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावर उड्डाणपूल होण्याच्या मागणीला यश आले याचा मनस्वी आनंद आहे.

याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, आम दार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.