हातकणंगले विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत! जातीय समीकरणे निवडणुकीत ठरणार महत्त्‍वाची…..

हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, यापैकी आमदार राजू आवळे (कॉग्रेस), माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर (शेतकरी संघटना) आणि महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे.जातीय समीकरणे या निवडणुकीत महत्त्‍वाची ठरण्याची शक्यता आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती आघाडी रिंगणात आहेत. यापैकी आमदार राजू आवळे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि जनसंपर्काची शिदोरी घेऊन रिंगणात उतरले आहेत. कॉग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) यांची त्यांना सोबत असणार आहे. महायुतीतून जनसुराज्यचे उमेदवार दलित मित्र अशोकराव माने रिंगणात आहेत.

२०१९ च्या पराभवानंतरही माने यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील संपर्क सोडलेला नाही. प्रत्येक कार्यक्रम, सभा, समारंभातही त्यांनी हजेरी लावली आहे. या संपर्काच्या जोरावर ते निवडणूक रिंगणात उतरले आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि जनसुराज्यची ताकद त्यांच्या सोबत आहे.अखेरपर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहिलेले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना सरतेशेवटी शेतकरी संघटनेची साथ मिळाली. शेवटपर्यंत ते उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडे प्रयत्न करीत राहिले. मात्र, तेथे त्यांना नाराजी पत्करावी लागली.

शेवटी माजी खासदार राजू शेट्टींची शेतकरी संघटना, बच्चू कडूंची प्रहार संघटना आणि संभाजी राजेंची स्वराज्य संघटना यातून उभी राहिलेली परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून ते यंदा निवडणुकीला सामोरे जात आहेत.


काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजीव आवळे, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महादेवराव महाडिक, अमल महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, तसेच माजी खासदार राजू शेट्टी, आदींची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. राखीव मतदारसंघ असला तरीही बौद्ध, मातंग, चर्मकार, जैन, लिंगायत, मुस्‍लिम आणि मराठा अशा सर्वच समाजांची समीकरणे या निवडणुकीत महत्त्‍वाची ठरणार आहेत.