आमदार जयंत पाटील कधी येणार ॲक्टिव्ह मोडवर ? कार्यकर्त्यांमधून सवाल

आमदार जयंत पाटील मुरब्बी राजकारणी असून ते आठव्यांदा पूर्वीच्या वाळवा व सध्याच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडूण आलेले आहेत. पण, सध्या भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला आहे. जयंत पाटील सत्तेत असो किंवा नसो ते चांगलेच अॅक्टिव्ह असतात. मात्र, सध्या ते तितकेसे ॲक्टिव्ह दिसत नाहीत. याआधी लोकसभेनंतर ते दुप्पट वेगाने कामाला लागले होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली पीछेहाट आणि स्वतःच्या मतदारसंघात त्यांचे घटलेले मताधिक्य यामुळे ते शांत झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत निवडून येताना जयंत पाटलांची चांगली दमछाक झाली. त्यांना विरोधकांपेक्षा मतदारसंघात स्वकीयांशी अधिक संघर्ष करावा लागला.

शरद पवारांच्या जवळचे 40 पेक्षाअधिक आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले. मात्र जयंत पाटील आणि त्यांचे काही निष्ठावंत आमदार आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्याबरोबर आजही असून ते किल्ला लढवत आहेत. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची झालेली वाहतात पाहता स्वकीयांनीच जयंत पाटील यांना विरोध केलेला आहे. तर पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी जयंत पाटलांच्या ऐवजी इतर कोणालाही प्रदेशाध्यक्ष करा, प्रदेशाध्यक्ष बदला, अशी मागणी लावून धरली होती. याबाबत शरद पवार यांच्या कानावरही मागणी घातली होती.

विधानसभेत झालेल्या पराभवामुळे अद्याप जयंत पाटील यांच्यासह पक्षच सावरलेला नसल्याचे दिसत आहे.आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या असून जयंत पाटील आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा, लढण्याची हिंमत कधी देणार? ते स्वतः चार्ज कधी होणार? ते पक्षातील कार्यकर्त्यांना ‘हाउ इज द जोश’ कधी म्हणणार? का याकडे इस्लामपूर मतदारसंघासह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे.