आष्टा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने पळवण्याचे प्रयत्न, अन् महिलांना होणारी मारहाण यामुळे महिलांमध्ये घबराट आहे. आष्टा शहरासह परिसरात युवकांनी गस्त पथके स्थापून रात्रीचा पहारा सुरु केला आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील महिलेचे गंठण चोरट्यांनी लंपास केले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मर्दवाडी येथे आष्टा नगरपालिकेच्या जॅकवेलचे साहित्य ट्रकमध्ये घालून पळवून नेत असणाऱ्या दोघांना नागरिकांनी रंगेहात पकडले होते.
अज्ञात चोरट्यांनी येथील गायकवाड गल्लीतील एका घरातील महिलेकडे जेवणाची मागणी केली. महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यामुळे चोरट्याने पळ काढला. शुक्रवारी रात्री शहरातील शिंदे चौकातील औताडे गल्लीत एका घरात शिरून चोरट्यांनी महिलेला लाकडी बॅटने मारहाण केली. ती महिला बेशुद्ध पडली. चोरट्यांच्या हाती काही न लागल्यामुळे त्यांनी पलायन केले.
डांगे कॉलेज परिसरातील एका वस्तीवरील पाळीव कुत्र्याला चाकू मारून जखमी केले. अनेक गावांमध्ये परिसरातील कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, बागणी, बावची, चांदोली वसाहत, अंकलखोप गावांमधून नागरिकांनी गस्त सुरु केली आहे. अनेक ठिकाणी चोर समजून परप्रांतीय व अनोळखी नागरिकांना बेदम मारहाण होत आहे. विक्रेत्यांना गावात साहित्य विक्रीसाठी बंदी घालण्यात येत आहे.
रविवारी सायंकाळी चोर सापडला पण निघाला मनोरुग्ण. आष्टा-सांगली रोडवर हॉटेल बागायतदार येथे चोरटा सापडल्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने युवकांचे गट मिरजवाडीकडे रवाना झाले. सापडलेल्या युवकाला बेदम मारहाण झाली. त्याला आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले. रात्री डांगे कॉलेज, थोटे डेअरी, आतुगडे मळा परिसरात चोर दिसल्याच्या पोस्टने पहाटेपर्यंत गस्त पथकाची शोधाशोध सुरु होती. शहरात चोर दिसतात पण सापडत का नाहीत, अशाही चर्चांना ऊत येत आहे.
आष्टा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गावांमध्ये चोर सापडल्याच्या अफवा पसरत असून अनोळखी निरपराधांना मारहाण होत आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. चोरीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून पोलिसांशी संपर्क साधावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका, असे आवाहन आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी केले आहे.