कोल्हाटी समाजाला जातीचे दाखले गृह चौकशीच्या आधारावर देण्याचे आदेश प्रांताधिकारी यांना दिले आहेत, या समाजातील मुलांना शैक्षणिक अडचणी येऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहोत. जात पडताळणी कार्यालयस्तरावर अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी प्रसंगी जात पडताळणी कार्यालयात जाऊन बसू, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आष्टा अप्पर तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये आमदार जयंत पाटील व अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या हस्ते कोल्हाटी डोंबारी समाजातील नागरिकांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, झुंजार पाटील, संग्राम फडतरे, शिवाजीराव चोरमुले हे प्रमुख उपस्थित होते. वाळवा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी निवास अर्जुन यांच्या प्रयत्नातून आष्टा येथील कोल्हाटी समाजातील भटके विमुक्त समाजाचे २६ दाखले मिळाले. या कार्यक्रमाला, विराज शिंदे, अमित ढोले, चैतन्य ढोले, दीपक मेथे, विजय मोरे, विराज शिंदे, सुनील माने, संग्राम जाधव यांच्यासह आष्टा कोल्हाटी डोंबारी समाजाचे नेते रमेश मोरे, प्रकाश मोरे, रवि मोरे, युवा सरपंच राहुल मोरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.