आष्टा शहरातील पाणंद रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवा; निशिकांत पाटील यांची  मागणी 

आष्टा शहरातील अनेक प्रलंबित पाणंद रस्त्याचे प्रश्न सुटावेत, अशी मागणी निशिकांत भोसले पाटील यांनी निवेदनाद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. यावेळी आष्टा शहरातील गांधीनगर, दत्त वसाहत आणि साईनगर मधील सर्वे क्रमांक चार, सहा, नऊचा प्रश्न सोडवण्याबाबतही चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी आम. सदाभाऊ खोत, भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ माने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेठरे धरण येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आले होते. याप्रसंगी निशिकांत भोसले -पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली.

तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना आष्टा शहरातील अनेक पाणंद रस्त्यांच्या झालेल्या अडीअडचणी बाबत चर्चा केली. तसेच या रस्त्यांची कामे होण्यासाठी भरघोस निधी देण्याची मागणी ही केली. पाणंद रस्ता दुरुस्तीचे निवेदनही निशिकांत भोसले पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आष्टा शहरातील पाणंद रस्त्यांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली. तसेच साईनगर, दत्त वसाहत, गांधीनगर येथील जमिनीचा प्रश्न योग्य मार्गाने सुटावा यासाठीही प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.