सध्या प्रत्येक भागातील सुरक्षितता खूपच महत्वाची आहे. कारण खून, मारामारी यासह चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आटपाडी शहरातील विविध चौकांमध्ये जिल्हा नियोजनमधून बसवण्यात आलेले सात सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. परिणामी गेल्या महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन शहराची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.
आटपाडीत तीन ते चार वर्षांपूर्वी जिल्हा नियोजनमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामध्ये साठेनगर चौक येथे ३, दिघंची रोड बालटे वस्ती २, बाजार समिती गेट २, आबानगर चौक १, आवळाई रोड लागत राजरत्न मार्केट १, कौठुळी रोड १, नगरपंचायत २, सांगोला रोड १, शेटफळे चौक १, बसस्थानक २, कल्लेश्वर मंदिर १, निंबवडे – सूतगिरण रोड १ व अन्य, असे २१ सीसीटीव्ही बसवण्यात आले. मात्र, यामधील सात सीसीटीव्ही गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत.
शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. तर, शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनींना बाहेर पडल्यावर टवाळखोरांचा सामना करावा लागत आहे. महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. व्यापारी पेठेत अनेक सराफ दुकाने फोडण्यात आली आहेत. त्यांच्या तपासाचे नेमके काय झाले? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान, आटपाडी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मुख्याधिकारी वैभव हजारे हे राहतात. त्यांचेच घर काही दिवसांपूर्वी चोरट्याने फोडले होते. विशेष म्हणजे याच इमारतीमध्ये त्यांच्या शेजारीच सहायक पोलिस निरीक्षक राहत होते. परिणामी चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नाही.