खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची विट्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पहिलीच बैठक घेण्यात आली. शासन आणि प्रशासन ही राज्यकारभाराची दोन चाकी असतात. कारभार सुरळीत चालवायचा असेल तर या दोन्ही चाकांची दिशा एकच असली पाहिजे आणि शेवटच्या घटकाची उन्नती साधने हे शासनाबरोबरच प्रशासनाचे ही ध्येय असले पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून मला आपला मतदारसंघ आदर्शवत करायचा आहे. मी कोणते चुकीचे काम सांगणार नाही आणि कोणतेही चुकीचे काम होऊ देणार नाही. मला प्रचंड मताधिक्य मिळाले आहे.
मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षाही तितक्याच मोठया आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन आमदार सुहास भैया बाबर यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना आमदार सुहास भैया बाबर म्हणाले आमदार म्हणून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मी राहीन.आपल्याकडे आता पाणी आले आहे त्यामुळे कृषी, पशुसंवर्धन खात्यांच्या कामाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. कृषीचे अनुदान कुणाला मिळाले, कुणाला मिळाले नाही याचाही आढावा घ्या.
पशुसंवर्धन विभाग व सर्व विभागांमध्ये रिक्त जागा भरण्याचा माझा प्रयत्न आहे. आपणाला मिळालेली आमदारकी म्हणजे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ यांनी केलेले प्रचंड काम आणि जनतेचे अलोट प्रेम यामुळे आहे हे मी कधी विसरणार नाही. त्यामुळे काम करताना जनतेच्या स्वागतार्ह सूचनांचा आदर केला जाईल. पण कोणतेही काम करताना प्रशासनाचा मोठा वाटा आहे असेही ते म्हणाले.