महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सदस्य नोंदणीसाठी चढाओढ, इस्लामपूरसह वाळवा तालुक्यात…. 

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. सध्या भाजपने भाजप सदस्य नोंदणी प्रत्येक भागात राबवली आहे. सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी सदस्य नोंदणीची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरवात केली आहे. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सदस्य नोंदणीसाठी चढाओढ दिसून येत आहे. भाजपाने इस्लामपूरसह वाळवा तालुक्यात सदस्य नोंदणीचा धडाका लावत आघाडी घेतली आहे. शिवसेनेने दोन दिवसापासून नोंदणीस सुरवात केली आहे. राष्ट्रवादीत मात्र अद्यापही शांतता असून पक्ष नेतृत्वाच्या आदेशाची वाट पहावी लागत आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूक यशानंतर महायुतीची राज्यात मजबूत स्थिती आहे. तरीही महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणीला दमदारपणे सुरुवात केली आहे.

वाळवा तालुक्यात भाजपाच्या वतीने आ. सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, सम्राट महाडिक, माजी नगरसेवक विक्रम पाटील, युवा मोर्चाचे प्रवीण माने, जयराज पाटील, काम गार संघटनेचे अमित कदम यांनी सदस्य नोंदणीचा धडाका सुरू केला आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी १००० ते ५०० सदस्य नोंदणी वैयक्तिकरित्या पूर्ण केली आहे. वाळवा तालुक्यात सुमारे ३६ हजार सदस्यांचे टप्पा पूर्ण करत सदस्य नोंदणीत आघाडी घेतली आहे.

भाजपच्या सदस्य नोंदणीनंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यातील शिवसेना सदस्य नोंदणीस शुभारंभ झाला आहे. तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी सदस्य नोंदणीस सुरुवात केली आहे. त्यांना शहरासह ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळत आहे.

एकाबाजूला महायुतीतील भाजपा, शिवसेना हे दोन पक्ष सदस्य नोंदणीसाठी पुढे सरसावल्याचे दिसत आहे. परंतू महायुतीचा तिसरा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्यातरी शांततामय वातावरण आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून अद्यापही राष्ट्रवादीच्या सदस्य नोंदणीची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकतें वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी कार्यक्रम केव्हा सुरू होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.