एका चुकीमुळे होऊ शकते मोठी फसवणूक मुंबई धोकादायक प्रकरण उघड

मुंबईत (Mumbai) स्वतःच्या मालकीचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी काहीही करण्याची नागरिकांची तयारी असते. त्यातच म्हाडा, एसआरए किंवा खासगी इमारतीमधील घर आणि तेही बाजारभावापेक्षा कमी किंमतीत मिळत असेल तर अनेकजण पटकन खरेदी करण्याची तयारी दाखवतात. नागरिकांच्या याच स्वभावाचा गैरफायदा घेत मुंबईत स्वस्तात घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मागील काही दिवसांत मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वडाळा परिसरात हार विक्री करणारी महिला दोन विवाहित मुलांसह वास्तव्यास होती. एकाच घरामध्ये सर्वांना एकत्र वास्तव्यास अडचण होत असल्याने ती घराच्या शोधात होती. याचदरम्यान शेजारी येणाऱ्या एका व्यक्तीने तो घर खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असल्याचे सांगितले. त्याने येथील एका पुनर्विकास झालेल्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये घर असून ३५ लाख रुपये किंमत असल्याचे सांगितले. इतक्या कमी किंमतीत घर मिळत असल्याने महिलेने बैठ्या चाळीतील खोली आणि मुलाची चेन विकून २७ लाख रुपये एजंटला दिले. मात्र पैसे दिल्यावर केवळ चलढकल होत असल्याचे पाहून त्यांनी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली.

काळाचौकी येथील घराच्या शोधात असलेल्या दाम्पत्याच्या परिचयातील व्यक्तीने एका एजंटसोबत ओळख करून दिली. या एजंटने आपले कार्यालय असल्याचे भासवून म्हाडा, तसेच एसआरएच्या प्रकल्पातील घरे १० टक्के कोट्यातून मिळवून देतो, असे सांगितले. घराची गरज असल्याने आणि कमी किंमतीत मिळत असल्याने त्यांनी एजंटच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तब्बल ३५ लाख रुपये दिले. मात्र ना घर मिळाले, ना पैसे परत मिळाले.