लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली सर्वानीच पहिली. अनेक पक्षप्रवेश देखील समोर आले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक राजकीय समीकरणे बदलत आहेत. सत्तेसाठी पक्षबदल देखील होत आहेत.
लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यजित पाटील यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून इस्लामपूर – शिराळा मतदारसंघातील साखर सम्राटांची हवा कमी होऊ लागली. शिवाय विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांचा पराभव आणि आमदार जयंत पाटील यांचे मताधिक्य घटले. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विराज नाईक यांनी जिल्हा युवक अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे साखर सम्राटांच्या राजकारणाची गोडी असलेल्या दोन्ही मतदारसंघात साखर कडू होऊ लागली आहे.
दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या प्रत्येक नेत्याला सत्तेसोबत जायचे आहे. इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. परंतु, पाटील अजूनही तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडण्यास तयार नाहीत. इस्लामपूर मतदारसंघात गडकरी यांचे आगमन होत असतानाच शिराळा मतदारसंघातील माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे पुत्र विराज नाईक यांनी पक्षाच्या जिल्हा युवक अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मानसिंगराव नाईक यांच्या समर्थकांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कल असल्याची चर्चा आहे.
विराज नाईक यांनी आपले लक्ष उद्योग व्यवसायावर केंद्रित केले आहे. नवीन युवकांना संधी मिळावी म्हणून लोकसभा निवडणुकीवेळी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्याकडे युवा अध्यक्षपद सोडण्याची विराज नाईक यांनी मागणी केली होती. त्यामुळे पक्ष सोडण्याचा कोणताही हेतू त्यांच्या राजीनाम्यामागे नाही. जयंत पाटील यांची भूमिका शिरसावंद्य मानूनच राजकारणात कार्यरत राहणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळाला भेट देणार आहेत. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांचे समर्थक व विरोधकांच्याही भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत. त्यामुळे येथे चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
अजित पवार यांनी इस्लामपूर- शिराळा मतदारसंघात पक्षाचा पाया भक्कम करण्याची खेळी सुरू केली आहे. ऊस उत्पादकांसाठी वाघवाडी येथे गूळ पावडर प्रकल्प सुरू केला. या माध्यमातून अजित पवार हे जयंत पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जयंत पाटील व मानसिंगराव नाईक हे एकत्र राहणार की नाही, याविषयी मतदारसंघात उलटसुलट चर्चा आहे.
