महावितरणच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी निम्मा कोल्हापूर जिल्हा दिवसभर विजेविना राहिला. बराच वेळ वीज नसल्याने अंधारात रात्र काढावी लागली. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर दिलासा मिळाला.महावितरणने अतिशय तातडीच्या व दुरुस्तीच्या देखभाल कामासाठी जिल्ह्यातील २५ केंद्रातील वीजपुरवठा खंडित केला होता.
दिवस उजाडताच वीज गेली.सकाळी ८ वाजल्यापासून इचलकरंजी, कुरुंदवाड, गारगोटी, गगनबावडा, हुपरी, शिरोली, हातकणंगले, पार्वती औद्योगिक वसाहत यासह शहरी व ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. विजेअभावी नित्य कामांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. औद्योगिक उत्पादन पूर्णतः थंडावले होते. त्याचा उद्योजकांना आर्थिक फटका बसला.
महावितरणच्या विविध ठिकाणच्या पथकाने दुरुस्तीचे काम दिवसभर तातडीने सुरू ठेवले होते. काही ठिकाणी नवीन यंत्रसामग्री बसवण्यात आली. अनेक ठिकाणी देखभाल, दुरुस्तीची नित्य कामे जलद गतीने आवरण्याचे काम सुरू होते.