पट्टणकोडोलीत ग्रामीण रुग्णालय चालू करण्याच्या मागणीचे शिवसेनेतर्फे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन

सध्या अनेक भागात अनेक विकासकामे सुरु आहेत. अनेक विविध सेवासुविधा गावात होण्याची नागरिकांची मागणी असते त्यासाठी नेत्यांकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी देखील केली जाते. पट्टणकोडोली गावची लोकसंख्या साधारणतः ३० ते ३५ हजाराच्या आसपास आहे. हे गाव सध्या नगरपरिषद होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या गावाशेजारी पंचतारांकित औद्योगिक वसाहत वसलेली आहे.

पट्टणकोडोलीसह इंगळी, तळंदगे, हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी, रांगोळी, नेर्ली, तामगाव, हलसवडे, सांगवडेवाडी, सांगवडे, वसगडे या आसपासच्या गावातील नागरिकांना विविध उपचाराकरिता कोल्हापूर अथवा इचलकरंजी सारख्या शहरात जावे लागते. त्यामुळे त्यांना मानसिक व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. वरील सर्व गावांचा मध्य  साधणारे गाव म्हणून पट्टणकोडोली आहे.

याच गावात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालय चालू केले तर नागरिकांना विविध उपचाराकरिता याचा फायदा होऊन लोकांचा मानसिक व आर्थिक त्रास कमी होईल. तसेच येथे ग्रामीण रुग्णालय चालू करण्यासाठी आवश्यक अशी पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन पट्टणकोडोली येथे लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय चालू करावे, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालय चालू करावे, अशा मागणीचे निवेदन पट्टणकोडोली शहर शिवसेनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले. आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन स्वीकारुन लवकरात लवकर निरीक्षण करुन योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन निवेदनकर्त्यांना दिले.