लोकसभा विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणाबरोबर अनेक पक्षप्रवेश देखील झाले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. कोकणानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष फूटीनंतर सुजित मिणचेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत संधी न मिळाल्याने सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. हातकणंगलेचे माजी आमदार आणि गोकूळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.आज दर्श अमावस्येच्या मुहूर्तावर माजी आमदार सुजित मिणचेकर आज शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करीत आहेत.
हातकणंगले तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा कोणताही शिवसैनिक माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या समवेत एकनाथ शिंदे गटात जाणार नाही. याची खात्री कोल्हापूर जिल्हा उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेत अनेक घडामोडी झाल्या परंतु मातोश्रीवरून आलेले सर्व आदेश मानून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक काम करत राहिला व येथून पुढे काम करत राहील. परिणामी शिवसेनेत कोण आले व कोण गेले यापेक्षा शिवसेना वाढीसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असून, एकेकाळी शिवसेनेचे आमदार असणाऱ्या डॉ. सुजित मिणचेकर यांच्या समवेत अनेक शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी कळाली. पण ठाकरे घराण्यावर प्रेम करणारा कोणताही शिवसैनिक डॉ. सुजित मिणचेकर यांच्या समवेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार नाही, असे ठाम मत कोल्हापूर जिल्हा उबाठा गटाचे शिवसेनाप्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.
सध्या शिवसेना हा महाविकास आघाडीचा एक घटक असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आपण लढवणार असल्याचे मत यावेळी संजय चौगुले यांनी बोलताना व्यक्त केले. परिणामी येणाऱ्या काळात शिवसेना रस्त्यावरची लढाई करणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी शिवसेना पुन्हा एकदा तयारीला लागल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, गणेश भांबे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.