लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र समोर आले. अनेक पक्षप्रवेश देखील झाले. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची सदस्य नोंदणीची मोहीम नुकतीच पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास तीन ते साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाजप सदस्यांची नव्याने नोंदणी झाली आहे. त्यात आता शिवसेनेनेदेखील उडी घेऊन ‘शिवकार्य’ सदस्य नोंदणीला प्रारंभ केला आहे. भाजपकडून सदस्य नोंदणीला प्रारंभ झाल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेकडूनदेखील राज्यभरात शिवकार्य सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सर्वप्रथम या नोंदणी कार्याला सुरुवात केली.
तत्पूर्वी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचे प्रमुख म्हणून खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली. या संदर्भातील पहिलीच बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे बैठकीत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र खासदार धैर्यशील माने यांच्याकडून कामानिमित्त आमदार राजेश क्षीरसागर हे मुंबईत आहेत, आणि आमदार नरके हे पूर्वनियोजीत कार्यक्रमानिमित्त मतदारसंघात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
तत्पुर्वी, शिवसेनेत मंत्रिपदावरून झालेली नाराजी या बैठकीनंतर ही जवळपास परिस्थिती ‘जैसे थे’ च आहे. धैर्यशील माने यांच्या अध्यक्षाखाली बोलविण्यात आलेल्या बैठकीमध्ये वास्तविक पक्षाच्या कार्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे होते, मात्र तसे दिसले नाही. आ. राजेश क्षीरसागर हे अद्याप नाराजच आहेत. असे चित्र समोर येत आहे.
शिवाय शहरातील प्रमुख पदाधिकारीदेखील या बैठकीला उपस्थित नव्हते. आरोग्य मंत्रिपद मिळाल्यानंतर आबिटकर यांच्या स्वागतासाठी कोल्हापुरात असूनही स्वागतासाठी लावलेली अनुपस्थिती चर्चेत आहे. त्यामुळे हा डाग पुसून काढण्यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आम दार मंत्री आणि खासदारांची मोट एक आहे. हे दाखवण्याची सध्या गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये असलेली एकजूट विरोधकांपेक्षा महायुतीमधील पक्षांनाच अधिक मारक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे.
