दुष्काळग्रस्त तालुक्यांत जलसंधारणाच्या कामाला लवकरच केली जाणार सुरुवात

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक नेतेमंडळींकडून अनेक आश्वासने देण्यात आलेली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आता मोहोळ, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यांत दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. याच प्रयत्नातून चेन्नई येथील एन्व्हायर्न्मेंलिस्टक फाउंडेशन ऑफ इंडिया (EFI) या संस्थेच्या वतीने ‘सीएसआर’अंतर्गत जलसंधारणाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार शिंदे म्हणाल्या, की सोलापूर जिल्हा हा कमी पर्जन्यमानाचा प्रदेश आहे. जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यांतील काही भाग अद्यापही दुष्काळीच आहे. या भागातील दुष्काळाचा डाग पुसावा, यासाठी जलसंधारणाच्या योजना राबवाव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना मी मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासह अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. त्याशिवाय काही पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून देखील जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

त्याच भूमिकेतून आम्ही जलसंधारणाची कामे करणार आहोत. त्याठी चेन्नई येथील पर्यावरणप्रेमी फाउंडेशन ऑफ इंडिया (EFI) ही संस्था जिल्ह्यातील जलसाठे पुनर्संचयित करण्याचे काम हाती घेणार आहे, ही सर्व कामे सामाजिक जबाबदारी अंतर्गत केली जाणार असून, यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी घेतला जाणार नाही.

सुरुवातीला या संस्थेकडून सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ तालुक्यातील वाफळे, अक्कलकोट तसेच मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी-दहिवडी आणि डोंगरगाव या गावांतील जलसाठे पुनर्संचयित करण्याचे काम केले जाणार आहे. पर्यावरणप्रेमी फाउंडेशन ऑफ इंडिया (E.F.I) ही वन्यजीव संवर्धन आणि अधिवास पुनर्संचयन संस्था आहे, जी देशातील १८ राज्यांमध्ये कार्यरत आहे. आपण या संस्थेचे प्रमुख अरुण कृष्णमूर्ती. सी यांच्याशी चर्चा करून नंतर जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.