लेंगरेच्या शिंदे दाम्पत्याचे दातृत्व, मुलीच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमास बांधून दिली २५ लाखाची इमारत….

सध्या अनेक कार्यक्रमानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. जेणेकरून याचा सर्वसामान्यांना लाभ होईल. खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे शिंदे परिवाराने एक आदर्श निर्माण केला आहे.आपल्या लाडक्या लेकीच्या अकाली निधनाचे दुःख पचवत तिच्या स्मृती जतन करून ठेवण्यासाठी वृद्धाश्रमास २५ लाख रुपयांची रुपयांची इमारत बांधून देत लेंगरे येथील शिंदे दाम्पत्याने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. लेंगरे येथील गलाई व्यवसायिक युवराज शिंदे व सारिका शिंदे यांची कन्या समृद्धी हिचे काही वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. समृद्धीच्या अकाली निधनाने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

या दुःखातून सावरत त्यांनी समाजातील वंचित घटकांना मदत करण्याचे ठरवले. यातूनच त्यांनी मोही (ता. खानापूर) येथे असलेल्या जलहरी शबनाक वृद्धाश्रमात तेथील अनाथ लोकांना राहण्यासाठी २५ लाख रुपये खर्चून भव्य अशी इमारत बांधून दिली आहे. वृद्धाश्रमाचे संस्थापक राजेश गडकरी व उपाध्यक्ष प्रतिभा गुरव यांनी या वृद्धाश्रमामध्ये ४८ निराधार लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. कोणतेही शासकीय अनुदान मिळत नसतानासुद्धा येथे या लोकांची जेवण, आरोग्य, कपडे यांची सर्व व्यवस्था केली जाते.

शिंदे यांनी सर्व सोयींनीयुक्त अशी इमारत बांधून दिल्याने निराधार लोकांच्या राहण्याची व्यवस्था झाली आहे. रविवारी या इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार सुहास बाबर, मुंबईचे आयकर उपायुक्त डॉ. सचिन मोटे, सांगली जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, डॉ. गणेश यमगर, सुहास पाटील, गलाई असोसिएशनचे गणपतराव पुदाले, प्रकाश बागल, धैर्यशील पवार आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. शिंदे परिवाराचे परिसरातून कौतुक होत आहे.