अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली मानसिकता कोणत्या वाईट थराला जाऊ शकते, याचा भयंकर प्रकार गुरुवारी (दि.27) खानापूरात समोर आला आहे. रुमेवाडी क्रॉसजवळील शेतवडीमध्ये एका जीवंत डुकराचे हातपाय बांधून त्याला खड्ड्यात पुरले असल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.खानापूर-हेमाडगा रस्त्यावर रुमेवाडीनजीक विलास बेडरे आणि जोतिबा बेडरे यांच्या शेतवडीमध्ये हा अघोरी प्रकार घडला आहे. करंबळ ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष विलास बेडरे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. तेव्हा काही कुत्री भुंकत असल्याचे दिसून आले.
जवळ जाऊन पाहिले असता, हात पाय बांधलेल्या डुकराचे कुत्री लचके तोडत असल्याचे दिसत होते.या बरोबरच बाजुलाच कुवाळे, नारळ, पान विडे, लिंबू, बिब्बे, हळकुंडे, तसेच जंगली प्राण्याचे अवयव आढळून आले आहेत. तसेच बाजूला खड्डा काढून त्यामध्ये जिवंत डुकराला पुरण्यात आले होते.
पण कुत्र्यांनी माती उकरून डुकराला बाहेर काढले होते. कुत्र्यांनी चावा घेतल्याने डुक्कर जखमी अवस्थेत पडून होते. हे ठिकाण तीन गावच्या सीमेवर असल्याने येथे नेहमी भानामतीचे प्रकार घडत असतात.