अलीकडच्या काळात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद माजवलाच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यात गवे रेडे आढळून आल्याने नागरिकांमध्ये आणखीनच भीती निर्माण झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी, लक्ष्मी डोंगर परिसर आणि तलाव परिसरात तीन गव्यांचा कळप रात्री परिसरातील नागरिकांना दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा कळप अतिग्रेच्या दिशेने आला असून तो नवमहाराष्ट्र सूतगिरणीच्या मागील बाजूस, तसेच तलाव परिसर आणि लक्ष्मी डोंगर परिसरात बिनधास्त भटकंती करत फिरत असल्याचे अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांनी पाहिले आहे. याबाबत वन अधिकाऱ्यांना कळवण्यात आले असून हे गवे रेडे नागरी वस्तीत जाऊ नयेत यासाठी वन विभागाचे कर्मचारी ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी गव्यांना नागरी वस्तीमध्ये शिरण्यांसाठी रोखले असल्याने ते परत कुंभोजच्या बाजूने परतले असल्याचे समजते.
तर काही नागरिक रात्रीच्या वेळी फटाके उडवून नागरी वस्तीत येण्यास त्यांना मज्जाव करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. अतिग्रे, आळते, माणगाववाडी, माणगाव, साजणी, तिळवणी, कोरोची हातकणंगले, लक्ष्मी औद्योगिक वसाहत परिसरात रात्री अथवा दिवसा कामासाठी जाणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी काळजीपूर्वक वावरणे गरजेचे आहे.
