सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायती उद्याही रहाणार बंद! गावगाडा ठप्प

राज्य सरकार पातळीवर असणार्या वेगवेगळ्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज १८ ते २० डिसेंबर या कालावधीत तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सरपंच व ग्रामसेवक संघटनेने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे.

तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे गावगाडा ठप्प झाला आहे. ग्रामपंचायत सरपंच यांचे मानधनासह, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांच्या प्रश्नांना संदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषदेसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या राज्यभरातील सर्व संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ग्रामपंचायत सरपंच यांच्यासह कर्मचारी यांच्या गटांगळ्या मागण्यासाठी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत या १८, १९ आणि २० डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येवून आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे गावगाडा ठप्प झाल्याचे दिसून आले.

प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक संघटनेने तीन दिवस कामकाज बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. काल सोमवार पासून पुढील तीन दिवस ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प राहणार आहे. तालुका पातळीवर ग्रामपंचायत कार्यालये बंद राहणार असून सांगोला तालुक्यातील ग्रामसेवक तलाठी व सर्व शासकीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

या बंद काळात ग्रामसेवक कोणत्याही प्रकारच्या बैठकीला हजर राहणार नाहीत. सरपंच संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, संगणक परिचालक संघटना, ग्राम रोजगार सेवक संघटना आणि ग्रामसेवक संघटना या काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने गाव कारभार ठप्प झाला आहे.

सरपंच, उपसरपंच यांचे मानधन थकीत बाकी अदा करावी, शंभर टक्के मानधन शासनाने द्यावे, ग्रामपंचायत सदस्यांचा थकीत बैठक भत्ता वाढीव अनुदानासह अदा करावा, विमा संरक्षण द्यावे, विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यावा, शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सहा विभागातून सहा सरपंच आमदार असावेत, मुंबईत सरपंच भवन उभारावे, ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमदार निधीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य निधी असावा, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावे आदी मागण्यासाठी ३ दिवस आंदोलन करण्यात येत आहे.