सोलापूर, नगर, पुणे, धाराशिव या चार जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा ५ जानेवारीलाच तळ गाठणार आहे. सध्या धरणात २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून ‘एकरूख’ नंतर आता सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार असून जानेवारीत शेतीसाठी एक आवर्तन सोडले जाईल.
त्यानंतर मात्र फेब्रुवारी ते जून या काळात धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे.अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल ७२ गावांसाठीच्या एकरूख योजनेत पहिल्यांदाच उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. दोन ते अडीच टीएमसी पाणी हिप्परगा तलावात सोडले जात आहे. त्याठिकाणाहून पुढे कॅनॉलद्वारे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरी, कुरनूर बंधाऱ्यात नेण्यात येत आहे.
आता २५ ते ३० डिसेंबर दरम्यान भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. त्यासाठी सहा ते सात टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने जानेवारीपर्यंत धरण उणे होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. साधारणतः १ ते १० जानेवारी दरम्यान शेतीसाठी यंदाच्या वर्षातील शेवटचे आवर्तन सोडले जाईल, असेही सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीपासूनच जिल्ह्याला टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार असून त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावरही होवू शकतो, अशी स्थिती आहे. पावसाळा संपताना १७ ऑक्टोबर रोजी उजनी धरणात ६०.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मात्र, सध्या १७ डिसेंबर रोजी उजनीत २१.०९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात तथा धरण क्षेत्रात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने धरण अवघे ६६ टक्केच भरले होते, तरीदेखील अवघ्या २ महिन्यातच ४० टक्के पाणी संपले आहे हे विशेष. उजनी धरणात सध्या ११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून सद्य:स्थितीत धरणातील एकूण पाणीसाठा ७५ टीएमसीपर्यंत आहे. पण, धरणात सध्या १८ ते २० टीएमसी गाळ साचलेला आहे. त्यामुळे ४४ टीएमसी पाणी वापरता येईल, मात्र त्यासाठी दुबार, तिबार पंपिंग करावे लागणार आहे.
तत्पूर्वी, उणे १० ते १५ टक्क्यांपर्यंत कॅनॉलमधून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य आहे. त्यामुळे जानेवारीत कालवा सल्लागार समितीतील बैठकीनुसार शेतीला एक आवर्तन सोडण्यात येईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.