कधी पाऊस, कधी धुके, कधी कडाक्याची उन्ह, तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र हवामानामुळे यंदा द्राक्षावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे अख्खा घडच करपत आहे. द्राक्षावर फळछाटणीनंतर पंधरा ते वीस दिवसांपर्यंतच करण्याचा हल्ला होऊ शकतो. यानंतर दावण्या व भुरीचा धोका उरतो. यंदा मात्र, द्राक्ष पक्वतेच्या स्थितीत पोहोचली असतानाही करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने तयार मालाची अवस्था बिकट झाली आहे.
गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. कधी पहाटेपासून तर कधी दुपारीच पावसाने वीजेच्या कडकडाटासह हजेरी लावली होती. यावेळी द्राक्ष बागामध्ये पाणी साचल्याने रोगावर प्रतिबंधक औषधाची फवारणीही करता आली नाही. ज्या ठिकाणी फवारणी करणे शक्य झाले अशा बागेमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने प्रतिबंधात्मक औषध फवारणी वाया गेली.
याचा परिणाम गेल्या दोन दिवसांपासून बागेमध्ये दिसू लागला असून अगदी हरभर्याएवढ्या झालेल्या द्राक्ष मण्यापासून २० ते २२ ब्रिक्स साखर तयार झालेल्या मण्यामध्ये आणि बाजारात पाठविण्यासाठी तयार झालेल्या द्राक्ष घडावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.मिरज तालुक्यातील आरग, बेडग, एरंडोली, खंडेराजुरी परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे.
सकाळी बागेच्या एखाद्या कोपर्यात दिसत असलेला करपा सायंकाळपर्यंत पूर्ण बागेत दिसत असल्याने या रोगाची पसरण्याची गती जास्त असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. करपा हा बुरशीजन्य रोग असला तरी आजअखेर याचा हल्ला प्रामुख्याने कोवळ्या कोंबावरच दिसून येत होता.
यंदा मात्र विचित्र हवामानामुळे द्राक्ष छाटणीनंतर ७० दिवस झाले तरी याचा हल्ला दिसू लागला आहे. हवामानात झालेला विचित्र बदल हेच याचे मुख्य कारण असल्याचे मानले जात असून यामुळे द्राक्षाचे घड करपून वाळत आहेत. तसेच मालाची गुणवत्ताही ढासळली आहे.