विटा येथील चांदी टंच फसवणुकीच्या प्रयत्नाचे प्रकरण सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोर्टात गेले आहे. विटा पोलिसांनी येथील सराफ असोसिएशनचा यासंबंधीचा अर्ज थेट आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे पाठवला आहे. दोन दिवसांपूर्वी विटा येथील चांदीच्या तयार दागिन्यांच्या दुकानात एक कदम नावाची व्यक्ती आली. त्याने ६० टंचाच्या कच्च्या चांदीच्या पट्ट्या आपण हुपरी (जि. कोल्हापूर) येथील सराफाकडून आणल्याचे सांगत त्याबदल्यात तयार दागिन्यांची मागणी केली. सराफ व्यावसायिकाने वजन करून चांदी ताब्यात घेतली. नेहमीप्रमाणे टंच काढण्यासाठी पाठवून दिली.
यावेळी ही चांदी ६० नव्हे, तर २० टंचाची असल्याचे स्पष्ट झाले. हे प्रकरण विटा पोलिस ठाण्यापर्यंत गेले. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन यामध्ये व्यवहारच झालेला नसल्याने गुन्हा घडलाच नाही, असे सांगितले. सराफानेही आपली काही तक्रार नाही, असे पोलिसांना लिहून दिले. मात्र विटा असोसिएशनच्या सराफ पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात येऊन पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले की, आम्ही हा प्रकार अतिशय गांभीर्याने घेतला आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे मत मागितले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.