हातकणंगले तालुक्यातील आळते येथील कुंथूगिरी रामलिंग रोडवरती सर्व्हे नं ९८५ मध्ये असलेल्या ग्रीन व्हॅले इको प्रॉडक्ट्स प्रा. लि. हा पत्रावळ्यासह इको फ्रेंडली वस्तू बनविन्याचा कारखाना आहे. या कारखान्यात बॉयलरमध्ये स्फोट होऊन वाऱ्याच्या झोताने आग सर्वत्र पसरल्याने बघता बघता संपूर्ण कारखाना आगीत जाळून खाक झाला. या आगीत तयार झालेला पक्का, कच्चा माल तसेच मशिनरीसह अन्य साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण कारखानाच आगीत भस्मसात झाल्याने सुमारे चारशे ते साडे चारशे महिला मजूरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. या घटनेमुळे अनेक महिला रडत असल्याचे पहायला मिळाले.
अग्नीशामक दलाच्या सुमारे आठ ते दहा बंबानी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. यावेळी पहिल्या शिफ्टच्या सुमारे पावणे दोनशे महिला गोदामात पॅकिंगचे व मशिनरी वरती उत्पादनाचे काम करत होत्या. या कारखान्यात दररोज ४०० ते ४५० कर्मचारी तीन शिष्ट मध्ये काम करतात. पहिल्या दोन शिप्टमध्ये महिला कर्मचारी मोठ्या संख्येने असतात. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कारखान्याचा बॉयलर भडकल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आकाशात उंच जात असलेले धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा पाच ते सहा किलो मिटरच्या अंतरावरूनही स्पष्ट दिसत होत्या.
आगीची माहिती समजताच नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीसांनी सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली. बॉयलरसाठी ऊसाच्या पाचट ( पाल्या) पासून तयार केलेले जळण आणि बगॅसचा वापर केला जात होता. बॉयलर भडकताच शिल्लक जळण आणि शेजारील कच्चा व तयार मालाला आग लागली. वाऱ्याच्या झोताने आग झपाट्याने पसरली. यामुळे कामगाराना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. बहुतांशी महिला जीव वाचवण्याच्या भीतीने आपले साहित्य तेथेच ठेऊन बाहेर पळाल्या. यामध्ये कपडे, जेवणाचे डबे, मोबाईल, पैसे जळून खाक झाले.
इचलकरंजी महानगरपालिका, पंचगंगा, शरद साखर कारखाना, जयसिंगपूर नगरपालिका, घोडावत उद्योग, हातकणंगले नगरपंचायत, पेठवडगांव नगर परिषदेच्या अग्नीशामक बंबानी आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.