वारकरी संप्रदायाचे व भागवत धर्माचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे स्मारक पंढरीत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र यासाठी जागेसंदर्भात अनेक अडचणी येत होत्या. याबाबत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनुसार रेल्वे विभागाकडून ही जागा राज्य सरकारकडे त हस्तांतरीत करण्यात आली असून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार असल्याची माहिती संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या बरोबर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजिली होती.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारकाचे काम गेले ८ वर्ष जागेअभावी प्रलंबित होते. परंतू शासनास वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहार व बैठकामुळे मागणीस यश आल्याचे दिसत आहे. तत्कालीन क्षत्रिय महासंघ व महाराष्ट्रातील सर्व शिंपी समाज यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी पंढरपूर येथे शिंपी समाजाची एकत्रित बैठक झाली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांची भेट घेऊन सदर जागेसाठी सविस्तर चर्चा केली होती. पंढरपूर प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने सदर जागेची पाहणी केली होती. याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी यांचीही भेट घेतली. संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी रेल्वे बोर्डाने पंढरपूर येथील ६५ एकर क्षेत्रालगतची जमीन महाराष्ट्र शासनास हस्तांतरित केली.
शेगाव दुमाला येथील जमीन ग.नं. १५७, क्षेत्र ६ हे १० आर. ही रेल्वे विभागाच्या ताब्यातील जमीन ३१ जानेवारी २०२५ रोजी पंचनामा करून राज्य शासनाने ताब्यात घेतली आहे. तसेच नोंदणीकृत अदलाबदल दस्त क्र. ५१३/२०२५ दि. ३ फेब्रुवारी रोजी करारनामा नोंदविलेला आहे. शासनाने ही जागा संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारकासाठी रिझर्व करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे सादर केलेला आहे.