इचलकरंजी येथे अस्ताव्यस्त वाहन पार्किंगमुळे अपघाची भीती

वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहर परिसरामध्ये वस्त्रोद्योगांसह इतर लहान-मोठ्या उद्योगाची संख्या लक्षणीय आहे. इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक लहान-मोठ्या रस्त्यांवर अवजड वाहन, चारचाकी, दुचाकी बेशिस्त पद्धतीने वाहन पार्किंग करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे, अशा पार्किंगमुळे वाहन चालवताना चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . तेव्हा अस्ताव्यस्तपणे वाहन पार्किंग करणाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रन पोलिसांनी कारवाई करून शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. वस्त्रोद्योगाला लागणारा प्रमुख कच्चा माल सुत परराज्यातून दररोज १०० ते १२५ ट्रक शहरात येतात.

त्याचप्रमाणे शेकडो ट्रक कापड परराज्यात जातो. त्यामुळे शहर परिसरातील मुख्य रस्त्यांसह अनेक मोठ्या – लहान रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी अवजड वाहने पार्किंग केल्याचे दिसून येते. अवजड वाहनाबरोबर चारचाकी, तीन चाकी तसेच दुचाकी वाहनेही कोठेही पार्किंग केल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र, त्या मानाने रस्ते अरुंद होत चालले आहे. त्यामुळे अनेकवेळा लहान-मोठे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. अस्ताव्यस्तपणे वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन चालका विरोधात कारवाईची मोहिम उघडणे गरजेचे आहे. तरच अंतर्गत वाहतूक सुरळीत होण्यात मदत होईल. तेव्हा याबाबत वाहतूक नियंत्रण कक्षाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.