इचलकरंजी येथील सांगली रोडवर नव्याने केलेल्या रस्त्याची खडी निघाली

इचलकरंजी येथील सांगली रोडवर रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. हे काम अजून पूर्ण झाले नसले तरी अवघ्या चार-पाच दिवसात या रस्त्याची खडी निघाली आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे रस्ते कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवाय ज्या भागात रस्ता करण्याची गरज आहे त्याऐवजी अन्य ठिकाणी रस्ते करण्याचा प्रताप ठेकेदाराकडून होत असल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. सांगली रोडवर आसरानगर बस थांबा ते सहकार नगर पर्यंतचा रस्ता एका बाजूने करण्यात येत आहे. या रोडवर अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. तसेच वडगाव बाजार समिती असून येथे बाजार भरतो. यामुळे रोडवर कायम गर्दी असते.

सध्या येथील रस्त्यावर मोठ्या खडीचा एक थर मारून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, डीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्नीककडे वळण असलेल्या ठिकाणी नव्याने केलेल्या रस्त्याची खडी निघाली आहे. यामुळे वाहतुकीसाठी रोड धोकादायक बनला आहे. परिणामी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने याची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे शहरातील काही रस्ते खराब झाले आहेत. ते करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले आहे. सुमारे ६२ कामांचा यामध्ये समावेश आहे. गावभागातील मखतूम दर्गा ते राणाप्रताप चौक आणि ढोले पाणंद ते राणाप्रताप चौक हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. प्राधान्याने हा रस्ता करण्याची गरज असताना ठेकेदाराकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. अशी अवस्था शहरातील अन्य काही भागांची दिसून येते. 

रस्ते कामासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत. मात्र, केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्ते योग्य दर्जाचे होत आहेत किंवा नाहीत याची पहाणी समिती मार्फत जनतेसमोर होणे आवश्यक आहे. अन्यथा हा निधी पुन्हा संगनमताने खड्ड्यात जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.