इचकरंजीत 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया ; मा. प्रकाश आवाडे

इचलकरंजी येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय व कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ संपन्न झाला. ग्रंथोत्सव कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. आवाडे म्हणाले, लेखकांनी वाचकांची आवड ओळखून विविध विषयांवर आधारीत त्या त्या भाषेतील पुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावा.

सध्या डिजिटलायझेशनमुळं सर्व बाबी ऑनलाईन मिळत आहेत. अशा वेळी ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण आदी विषयांची जगभरातील लेखकांची पुस्तकं विविध भाषांमध्ये डिजिटल पद्धतीनं उपलब्ध होत आहेत. यामुळे पुस्तकांच्या प्रती खरेदी करुन वाचण्याबरोबरच ई बुक वाचकांची संख्या वाढत आहे. वाचन आणि वाचकांच्या चळवळीला प्रेरणा देण्याच्या उद्देशानेच इचलकरंजीत ग्रंथ महोत्सव घेण्यात आला असून या ग्रंथोत्सवामुळे इचलकरंजीतील वाचकांना एकाच छताखाली दर्जेदार ग्रंथ खरेदीची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या डिजीटल युगात वाचकांनी डिजिटल वाचन साहित्याबरोबरच अधिकाधिक पुस्तके खरेदी करुन मराठी वाचन संस्कृती अधिक गतिमान करावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इचकरंजीत आयोजित करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.