Ichalkaranji Crime : मोबाईल लिंकला प्रतिसाद न दिल्‍याने आतेभावाने चाकूने भोसकले, गुन्हा दाखल

सध्या गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होऊ लागली आहे. खून, मारामारी, चोरी, अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. किरकोळ वादावादी खूपच वेगळे वळण घेते. असाच एक प्रकार यड्राव येथे घडला आहे. यड्राव (ता. शिरोळ) येथे मोबाइल लिंकवरून झालेल्या क्षुल्लक वादातून आतेभावाने चाकूने एकाला जखमी केले.

तौहीद फिरोज पिंजारी (वय २०, रा. रेणुकानगर, यड्राव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोहेल जहाँगीर नदाफ (सध्या रा. रेणुकानगर, यड्राव) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी घडली. संशयित सोहेल हा फिर्यादी तौहीदचा आतेभाऊ आहे. तौहीदच्या आईच्या ‘लाडकी बहीण’च्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी संशयित सोहेलच्या मोबाईलवर लिंक होती. त्यासाठी तौहीदने सोहेल याला फोन केला.

मात्र, त्याने फोन न उचलल्याने तौहीदने त्याला जाब विचारला होता. या कारणावरून सोहेल याने तौहीदला ‘बाहेर ये, तुला बघून घेतो’ असे धमकावले. त्यानंतर पोस्ट ऑफिससमोर त्याला गाठून चाकूने पोटाच्या डाव्या बाजूला वार केला. यात तौहीद गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.