विटा चांदी टंच फसवणूक प्रकरण; टोळी असल्याची चर्चा

विटा येथील चांदी टंच फसवणूक प्रकरणातील संबंधित व्यक्तीच्याबरोबर हुपरीतील ज्या सराफाने ६० टंचाचे प्रमाणपत्र दिले त्याच्यावरही गुन्हा दाखल होणार का, हा प्रश्न आहे. विट्यातील मायणी रस्त्यावरील चांदीच्या शोरूममध्ये परगावातून आलेल्या एकाने ६० टंचाची चांदी असल्याचे सांगून २० टंच शुद्ध चांदी दिली. त्याने तेवढ्याच टंचाचे आणि वजनाचे तयार दागिने खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्या शोरूममधील सराफाच्या सतर्कतेमुळे फसवणुकीचा हा प्रकार उघड झाला. कमी टंचाची चांदी देताना जादा टंच आहे, असे कागदोपत्री दाखवून सराफांकडून तयार दागिने न्यायचे, अशी टोळीच असल्याच्या चर्चा आता होत आहेत.

असे प्रकार केवळ विट्यातच नव्हे तर देशभरात होत असल्याची चर्चा होते आहे. याचे एक कारण असे सांगितले जाते की, खानापूर, आटपाडी, तासगाव, माण, खटाव वगैरे भागातील हजारो लोक गलाई व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात पसरलेले आहेत. त्यामुळे आता कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा ते दिल्ली आणि थेट काश्मीरपासूनच्या गलाई व्यावसायिक दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्कात आहेत. मूळच्या खानापूर तालुक्यातील एका गलाई व्यावसायिकाला तामिळनाडूतील सेलममध्ये अशाच प्रकारच्या फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. तब्बल ७३ किलो कमी टंचाची चांदी त्याच्या गळ्यात मारून दोघेजण पसार झालेत.