विटा एमडी ड्रग्जप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; मनसेची मागणी

विटा एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणाची सीबीआय किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष साजिद आगा यांनी निवेदनात म्हटले आहे की, विटा येथे सापडलेल्या एमडी ड्रग्ज कारखान्यात कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परंतु हा कारखाना कोणाच्या छत्रछायेखाली उभा राहिला, हा प्रश्न आहे.

या प्रकरणात कोणताच अधिकारी जबाबदार नाही, हे कसले गौडबंगाल आहे? सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला येथे ड्रग्जचा कारखाना चालू आहे, हे समजते. परंतु स्थानिक पोलिस अनभिज्ञ कसे होते? तीन हजाराच्या भंगार चोरीची माहितीसुद्धा खबऱ्यामार्फत कळते, तर एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा सुगावा स्थानिक पोलिसांना का लागू शकला नाही? नशेच्या गोळ्या, इंजेक्शन्स, गांजा याची पाळेमुळे या तालुक्यातून हद्दपार करावीत, तालुक्याला धडाकेबाज आणि सक्षम पोलिस अधिकारी द्यावा. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोणपे यांनाही निवेदन पाठवले आहे, अशी माहिती आगा यांनी दिली.