वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील वयोवृद्ध दत्ताजीराव थोरात यांची जमीन वन क्षेत्रात गेलेली होती. अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या प्रयत्नामुळे २० गुंठे जमीन त्यांना परत मिळाली. थोरात यांनी ही जमीन परत मिळवण्यासाठी तीस वर्षे संघर्ष केला. संबंधित विभागांना अर्ज व कागदपत्रे देत अनेक वेळा शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले. त्यानंतर आष्ट्याचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडे हे प्रकरण येताच त्यांनी याबाबत सर्व माहिती व कागदपत्रे यांची फडताळणी व शहानिशा करीत २० गुंठे जमिनीचा कब्जा थोरात या वयोवृद्ध शेतकऱ्यांस दिला. जमिनीचा कब्जा मिळताच थोरात कुटुंबियांना गहिवरून आले त्यांनी तहसीलदार राजशेखर लिंबारे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.
गोटखिंडी दोन डोंगर परिसरातील ३५० एकर क्षेत्र वनीकरण विभागाकडे आहे. ४० वर्षा पूर्वी वन विभागाने डोंगर ताब्यात घेतले. त्यावेळी मल्लिकार्जुन डोंगर पूर्व बाजूस थोरात यांची पाच एकर सोळा आर जमीन आहे. त्याची मोजदाद कधी झालेली नव्हती, कालांतराने मोजदाद केली असता क्षेत्र कमी भरू लागलेने शासकीय मोजणीअंती त्यातील २९ आर क्षेत्र वनीकरण विभागाकडे असलेचे समजून आले. त्यावेळेपासून वन व महसूलकडे तक्रारी दाखल करुन ३० वर्षे लोटली तरीही त्यांची जमीन त्यांना मिळालेली नव्हती.
