आष्टा येथे जागेच्या वादातून महिलेस रॉडने मारहाण

कदमवेस, आष्टा येथे कौटुंबिक जागेच्या वादातून तिघांनी शिवीगाळ करीत, जीवे मारण्याची धमकी देत प्रियांका केदारनाथ काटकर वय ३१ या महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी दिर मानसिंग पंडितराव काटकर, जावु गीता मानसिंग काटकर व प्रणव मानसिंग काटकर या तिघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काटकर कुटुंबियांच्या गट क्र. ७१७ च्या जागेच्या वाद सुरू असून आरोपींनी फिर्यादी प्रियांका काटकर यांच्या गोट्याकडील मार्ग बंद करून टाकला आहे.

दि. १ मार्च रोजी पावणे दोन वाजणेच्या सुमारास प्रियांका काटकर यांच्या कदम वेस आष्टा येथील जनावरांच्या गोट्या जवळ येत असताना आरोपी मानसिंग काटकर, गीता काटकर व प्रणव काटकर यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या डोक्यात चार ते पाचवेळा लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांचा मोबाईल प्रणव काटकर याने काढून घेतला. अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.