कोणासाठी हा एक फक्त विजय आहे. कोणासाठी हे अविस्मरणीय यश आहे. काहीजण या विजयाकडे बदला पूर्ण झाला, या भावनेतून पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये काल टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला. टीम इंडियाच्या फॅन्सना हा विजय सुखावून गेला. ते याकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहेत. टीम इंडियासाठी कदाचित लक्ष्याच्या जवळ पोहोचलो, इथपर्यंतच या विजयाच महत्त्व असेल. त्यांच्यासाठी हा वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमधील पराभवाचा वचपा नसेल. पण या टीममध्ये एक असा खेळाडू आहे, ज्याच्यासाठी फायनलमधील पराभवाचा हिशोब चुकता करण्यासारखा हा विजय आहे. हा खेळाडू आहे केएल राहुल.
दुबईत मंगळवारी 4 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलचा पहिला सामना खेळला गेला. या मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट राखून पराभव केला. भारताने या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो विराट कोहली ठरला. तो 84 धावांची शानदार इनिंग खेळला. धावांचा पाठलाग करताना त्याने टीमला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवलं. कोहली आपलं शतक पूर्ण करु शकला नाही. पण त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली.
सगळ्यांच्या नजरा कोहलीवर पण त्याच्याबद्दल मनात संशय
कोहलीच अपूर्ण राहिलेलं कार्य केएल राहुलने पूर्ण केलं. राहुल फलंदाजासीठा क्रीजवर आला, तेव्हा भारताच्या 35 ओव्हर्समध्ये 178 धावा होत्या. टीम विजयापासून 87 धावा दूर होती. 90 चेंडू शिल्लक होते. भारताचे 4 विकेट गेलेले. म्हणजे विजयाची हमखास खात्री नव्हती. सगळ्यांच्या नजरा कोहलीवर होत्या. पण राहुलबद्दल मनात संशय होता. तो पुन्हा भारताच्या पराभवाच कारण ठरेल अशी भिती होती.
ती इनिंग वाईट स्वप्नांसारखी
या सेमीफायनलआधी भारत-ऑस्ट्रेलियामध्ये शेवटचा वनडे सामना वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये झाला होता. त्यावेळी केएल राहुलची धिमी इनिंग सुद्धा पराभवाच एक कारण होती. त्या एका इनिंगमुळे केएल राहुलने मागच्या दीड वर्षात ट्रोलिंग आणि टीकेचा सामना केला. स्वत: राहुल सुद्धा काही प्रसंगात ती इनिंग वाईट स्वप्नांसारखी होती हे कबूल केलं. पुन्हा संधी मिळाल्यास सुधारणा करणार असल्याच त्याने म्हटलं होतं.
त्याच्या आतमध्ये असलेली बदल्याची ती आग शांत झाली
भूतकाळात जे झालं ती घटना आपण बदलू शकत नाही. पण त्यापासून बोध घेऊन नवीन आव्हान जरुर यशामध्ये बदलू शकतो. केएल राहुलने यावेळी हेच केलं. त्याने टीम इंडियाला फक्त आव्हानात्मक स्थितीतून बाहेरच काढलं नाही, तर शेवटपर्यंत क्रीजवर टिकून टीमला विजय मिळवून दिला. कदाचित हा नशिबाचा भाग असेल, या मॅचमध्ये विनिंग शॉट सुद्धा राहुलच्या बॅटमधूनच निघाला. त्याने शानदार सिक्स मारुन टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. केएल राहुल 34 चेंडूत 42 धावा काढून नाबाद राहिला. विजयी फटका खेळल्यानंतर केएल राहुल ज्या पद्धतीने ओरडला, कदाचित त्याच्या आतमध्ये असलेली बदल्याची ती आग शांत झाली असेल.