चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2025 चा हंगाम वाईट जात आहे. चेन्नईचा संघ आता प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता चेन्नई संघाने पुढील वर्षाची तयारी सुरू केली आहे. चेन्नई संघाने तरुणांना संधी देण्यास सुरुवात केली आहे. सततच्या पराभवांदरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाने मुंबईच्या आयुष म्हात्रेला जसी संधी दिली तशी आता आणखी क्रिकेटपटूला संघी देण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे.
उर्विल पटेलला मेगा लिलावात कोणत्याही संघाने समाविष्ट केले नाही. उर्विल पटेलने सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत 28 चेंडूत शतक ठोकून सर्वांना आश्चर्यचकित केले. तो भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा फलंदाजही बनला. पण त्यानंतरही कोणत्याही फ्रँचायझीने त्याला समाविष्ट केले नाही. आता चेन्नईने गुजरातचा (Gujarat) यष्टीरक्षक-फलंदाज उर्विल पटेलला चाचण्यांसाठी बोलावले आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी ESPNcricinfo शी बोलताना सांगितले की, “गुजरातचा यष्टीरक्षक-फलंदाज उर्विल पटेलला चेन्नई सुपर किंग्जने चाचण्यांसाठी बोलावले आहे. यावरून असेही दिसून येते की चेन्नई संघात आता बदल सुरू झाले आहेत. मला आतल्या बातम्या मिळाल्या आहेत की सीएसकेने उर्विल पटेलला ट्रायल्ससाठी बोलावले आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दोन शतके झळकावली. त्याला कोणत्याही फ्रँचायझीने घेतले नाही याचे मला आश्चर्य वाटते.”
अलिकडेच, सीएसकेने ऋतुराज गायकवाडच्या जागी युवा फलंदाज आयुष म्हात्रेचा संघात समावेश केला आहे. हंगामाच्या मध्यभागी आयुष म्हात्रेलाही चेन्नईने चाचण्यांसाठी बोलावले होते. आता हे स्पष्ट झाले आहे की चेन्नई संघ आता आगामी हंगामावर लक्ष केंद्रित करत आहे. चेन्नई व्यवस्थापन आता तरुण खेळाडूंमध्ये गुंतवणूक करण्यावर गांभीर्याने काम करत आहे. पंजाब किंग्जकडून आठव्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्ज चा आयपीएल 2025 मधील प्रवास बुधवारी संपला. या हंगामात 10 पैकी फक्त 2 सामने जिंकणारा हा संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण मैदानावर खराब कामगिरी असूनही, संघ व्यवस्थापनाने भविष्यासाठी तयारी सुरू केली आहे.