रेंदाळ गावच्या हितांच्या मागण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पातून ठोस मागण्यासाठी संघर्ष करणाऱ्या डॉ. सचिन मेथे यांना तहसीलदार आयोजित आश्वासक बैठकीत मार्ग काढताना आज उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व महत्वपूर्ण पाणीपुरवठा योजनेला वीज उपलब्ध करण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने विषय चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेंदाळ शहरातील गायरान जमीनीवर १० हेक्टर क्षेत्रावर सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये जनतेच्या भावनांशी खेळ खंडोबा सुरू आहे.
जनतेचे मत विचारात न घेता मुठभर पुढाऱ्यांच्या वर्चस्वाखाली हा प्रकल्प रेटला जात असून यामध्ये ग्रामसभेत जनतेच्या हिताची बतावणी केली व महत्वपूर्ण मागणीला केराची टोपली दाखवत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. गायरान मोजणीसाठी थयथयाट करण्यात आला.मात्र, मोजमाप न करता प्रकल्पाला जमीन दिली आणि ग्रामपंचायतीला घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेसाठी ४० गुंठे जमीन मागितली असता तीन गुंठे जमीन देण्याची दानत दाखवून चतुःसीमेची हास्यास्पद मागणी केली. या प्रकल्पाचा हेतू शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा आहे.
मात्र, शहरातील पाणीपुरवठा योजना सोलर पॅनल वर करणे, शिक्षण, आरोग्य व शासकिय विभागाला वीज उपलब्ध करणे, सीएसआर फंडातून विकासकामे करणे यांसारख्या लोकहिताच्या मागणीचा पाठपुरावा करून एकवेळ लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबला असून आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजिली होती. यामध्ये केवळ कागदोपत्री हालचाल करून बैठकांचा फार्स करत आहेत. डॉ. सचिन मेथे यांनी दिशाभूल करणाऱ्या प्रशासकीय लोकांविरोधात आंदोलन करून संबंधित विभागावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले.