उद्या चंदूरमध्ये उद्या देश-विदेशातील मल्लांचे जंगी मैदान, पहायला मिळणार दंगल……..

सध्या अनेक भागात गावोगावी यात्रांचे दिवस आहेत. यात्रेनिमित्त अलोट गर्दी देखील पहावयास मिळत आहे. अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. बैलगाडी शर्यती, कुस्त्या, मनोरंजन तसेच क्रीडा स्पर्धा देखील घेतल्या जातात. हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील श्री महासिद्ध यात्रेनिमित्त देखील अनेक जंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री महासिध्द देवाच्या यात्रेनिमित्त चंदर ग्रामपंचायत, राधाकृष्ण तालीम मंडळ, चंदुर क्रिकेट स्पोर्ट्स व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे जंगी मैदान उद्या गुरूवारी १६ जानेवारीला होणार आहेत.

या कुस्ती दंगलीमध्ये चार महाराष्ट्र केसरी मल्ल लढणार असून कुस्ती मैदानाचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे यांचे हस्ते होणार असून खासदार धैर्यशील माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर हे उपस्थित राहणार आहेत.

या प्रेक्षणीय लढतीमध्ये प्रामुख्याने आमदार केसरी लढतीसाठी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध पै तेजा दिल्ली, सभापती  केसरीसाठी उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, विरुद्ध वीरेंद्र कुमार हरियाणा, सरपंच केसरीसाठी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख विरुद्ध पै. सुपिंदर सिंह पंजाब, उपसरपंच केसरीसाठी महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध पै. जयदीप कुमार युपी पै. जलाल इराण विरुद्ध पै. विक्रांत कुमार, पै. शुभम शिदनाळे विरुद्ध पै. हरीश कुमार, पै. श्रीमंत भोसले विरुद्ध पै. सागर तामकारे, पै. शुभम कोळेकर विरुद्ध पै. उदयकुमार, पै. पागल बाबा लाडी विरुद्ध पै. अब्दुल या कुस्त्या होणार आहेत. 

तसेच दिनांक १३ व १४ रोजी झालेल्या १३ वजनी गटामध्ये झालेल्या उपांत्य फेरी व अंतिम फेरी च्या २६ कुस्त्या याचवेळी घेण्यात येणार आहेत. देश विदेशासह भारतातील नामांकित मल्लांची निवड या कुस्ती रणसंग्रामामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच महिला कुस्तीमध्ये प्रामुख्याने महिला सरपंच केसरीसाठी पहिली महिला महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडी विरुद्ध ऋतुजा विल्ले व प्रतिभा कांबळे विरुद्ध सोमय्या नागरमनोळी या प्रमुख महिला कुस्त्या होणार आहेत. पैलवान नितीन माने, सांगली विरुद्ध सुमित सुतार ही उद्घाटनाची आकर्षक कुस्ती होणार आहे.

आंतरराष्ट्रीय व देशातील हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, युपी इत्यादी राज्यातील मल्लांचा जंगी महासंग्राम होणार आहे. या स्पर्धांकडे कुस्ती शौकिनांचे लक्ष लागले असून हातकणंगलेचे मा. पं.स. सभापती महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदुर ग्रामपंचायत, यात्रा कमिटीच्यावतीने कुस्ती मैदानाची युद्ध पातळीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. परिसरातील कुस्ती शौकिनांमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांची दंगल पहावयास मिळणार आहे. मैदानाबाहेर दोन मोठ्या स्क्रीनची व्यवस्थाही यावेळी करण्यात आली असून स्क्रीनवरही कुस्ती पहावयास मिळणार आहे.

तरी पंचक्रोशीतील सर्व कुस्ती शौकिनांनी या कुस्ती दंगल पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी मा. प.स. सभापती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच योगिता हळदे, संदीप कांबळे, मारुती पुजारी, सुधाकर कदम, सचिन हळदे, ग्रामविकास अधिकारी बी.व्ही. कांबळे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटक वस्ताद सचिन पुजारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.