इचलकरंजीत दिवसाढवळ्या जबरी चोरी! दोन लाख 39 हजाराचा मुद्देमाल लंपास…..

अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रमाणात भरपूर वाढ झालेली आहे. इचलकरंजी शहरात देखील अलीकडे गुन्हेगारीच्या प्रमाण वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. कधी खून, मारामारी तर कधी चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता तसेच भीतीचे वातावरण पसरले आहे. इचलकरंजीतील सोलगे मळा शहापूर येथे अशाच एका चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे. प्रशांत सदाशिव डांगे हे आपल्या आई-वडील पत्नीसह सोलगे मळा शहापूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व जुनी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.

शनिवारी आठ तारखेला सकाळी साडेपाच वाजता प्रशांत आपल्या परिवारासह बहीण सारिका व मुलांसह दाजींच्या चारचाकी गाडीतून ज्योतिबा देवदर्शनासाठी घराला कुलूप लावून गेले होते. ते जोतिबा तसेच आष्टा येथील अंबाबाई देवदर्शन घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या घरी परतले असता त्यांना आपल्या घराचे लावलेले कुलूप दिसले नाहीत.

त्यावेळेस त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्यांना बेडरूम मधील तिजोरीतील साहित्य अस्ताव्यस्त जमिनीवर पडलेले दिसून आले. तसेच तिजोरीतील सर्व कप्पे हे उचकटलेले होते. तिजोरीतील आईचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एक लाख 75 हजार असा एकूण दोन लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.प्रशांत डांगे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.