इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरू असलेल्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने ऑसी कर्णधार पॅट कमिन्ससाठी २०.५० कोटी रुपये मोजले आणि मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ कोटी रुपये मोजले.या कोट्याधीशांच्या पंक्तित आता विदर्भाचा शुभम दुबे ( Shubham Dubey ) जाऊन बसला आहे. २० लाख मुळ किंमत असलेल्या यवतमाळच्या या खेळाडूने आज कोट्यवधी कमावले.
७.१० कोटी खिशात शिल्लक असलेल्या राजस्थान रॉयल्सने शुभमसाठी २५ लाखांची पहिली बोली लावली. अनकॅप खेळाडूसाठी दिल्ली कॅपिटल्सनेही कंबर कसली. दिल्ली व राजस्थान दोघंही थांबण्याचं नाव घेत नव्हते. ९५ लाखांपर्यंत बोली गेल्यानंतर दिल्लीने १ कोटीसाठी पॅडल उचलला.
हळुहळू २.४० कोटीपर्यंत दिल्लीने त्याचा भाव वाढवला. शुभमचा भाव ३,४ आणि नंतर ५ कोटींच्या वर गेल्यान सर्वांच्या भुवया उंचावल्या. अखेर राजस्थान रॉयल्सने ५.८० कोटींमध्ये ही डिल पक्की केली.दुबेने मुश्ताक अली ट्रॉफीत सर्वांचे लक्ष वेधले होते. २९ वर्षीय खेळाडू विदर्भ संघातील मधल्या फळीतील फलंदाज आहे.
विदर्भाच्या शुभम दुबेने फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. डावखुरा फलंदाज दुबेने सात डावात १८७.२८ च्या स्ट्राईक रेटने २२१ धावा केल्या. त्याने या स्पर्धेत बंगालविरुद्ध संस्मरणीय कामगिरी केली होती.
विदर्भाने २१३ धावांचे लक्ष्य गाठले होते. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दुबेने २० चेंडूंत तीन चौकार आणि षटकारांच्या मदतीने नाबाद ५८ धावा केल्या.एक काळ असा होता की शुभम दुबेकडे बॅटींग ग्लोव्हज घ्यायचेही पैसे नव्हते. वडील बद्रीप्रसाद यांच्या पानाच्या टपरीवर घरचा खर्च चालायचा…
नागपूरातील कमला स्क्वेअर येथे त्यांची पान टपरी आहे. अशा कुटुंबातील शुभमला राजस्थान रॉयल्सने ५.८० कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. ”मला विश्वासच बसत नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आयपीएल लिलावात बोली लावली जाईल, असे वाटले होते. पण, एवढी मोठी रक्कम मलाही अपेक्षित नव्हती,”असे शुभमने सांगितले.