घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे

इचलकरंजी, वेतनप्रश्नी गेल्या तीन दिवसांपासून घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या उपोषणाची बुधवारी सांगता झाली. महापालिकेत उपायुक्त अशोक कुंभार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वेतनाबाबत केलेल्या मागण्या मक्तेदार कंपनीकडून मान्य करण्यात आल्या. त्यामुळे आता उद्या गुरूवारी २६ पासून शहरातील घरोघरी जावून कचरा संकलनाचे काम पुन्हा सुरु होणार आहे.

 मक्तेदार कंपनी करारानुसार वेतन देत नसल्याची तक्रार करीत सोमवारपासून प्रातिनिधीक स्वरुपात १२ घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी महापालिका प्रवेशव्दारात उपोषण सुरु केले होते. दोन दिवस दोन बैठका झाल्यानंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे कचरा संकलन व कचरा उठाव करण्याचे काम ठप्प झाले. साहजिकच शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. दरम्यान, उपायुक्त कुंभार यांच्या दालनात आज पुन्हा बैठक झाली. त्यामध्ये चर्चेनुसार मक्तेदार कंपनीने वेतनप्रश्नी सर्व मागण्या मान्य केल्या. यामध्ये करारानुसार चालकांना १३,५०० रुपये, मदतनिस यांना १३ हजार रुपये वेतन देणे, चार साप्ताहिक सुट्ट्या मान्य करणे, तासावर वेतन न आकारता उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सकाळी ६ ते दुपारी १ ही कामाची वेळ निश्चीत करण्यात आली. या निर्णयानंतर उपायुक्त कुंभार उपोषणस्थळी आले. त्यांनी उपोषणकर्त्यांना सरबत दिले. त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.त्यामुळे तातडीने कांही भागातील  कचरा उठाव करण्यात आला. उद्या २६ पासून पुन्हा घंटागाड्या शहरातील प्रत्येक भागात कचरा संकलन करतांना दिसणार आहेत. प्राचार्य ए. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बैठकीस आरोग्य अधिकारी सुनिलदत्त संगेवार उपस्थित होते.