हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे विनापरवाना बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या रासायनिक खत उत्पादन कारखान्यावर जिल्हा परिषदेचे खत निरीक्षक व जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरिक्षक यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत २ लाख ८ हजार ३२० रुपयांची डायटोमाईट सिलिकॉन खताची २४८ पोती जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी सूरगोंडा गोंडा पाटील याच्या विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सुशांत बाजीराव लव्हटे यांनी दिली आहे.
केमिकल कंपनीतून निवृत्त झालेले सूरगोंडा पाटील यांनी तारदाळ येथील शिवगोंडा महादेव चौगुले यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये रासायनिक खत उत्पादन कारखाना सुरू केला आहे. या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संभाजी शेणवे यांनी २७ फेब्रुवारी रोजी पंचांसमक्ष याठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी श्री यशोदा केमिकल्स मु. पो. समडोळी (जि. सांगली) यांनी उत्पादीत व विक्री केले आहे, अशी मजकूर असलेली भगव्या लालसर रंगाची डायटोमाईट सिलिकॉनची २ लाख ८ हजार ३२० रुपये किमतीची ४० किलो वजनाची २४८ पोती मिळून आली आहेत. सूरगोंडा पाटील याने २ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री यशोधन केमिकल या नावे सिलिकॉन खत तयार करण्याच्या व्यवसायाकरिता भाडेकरार केल्याचे निदर्शनास आले.
सूरगोंडा पाटील यांनी खत उत्पादनाचा परवाना २०१७ मध्ये उद्योग भवन सांगली येथून घेतला. त्याची मुदत २०२२ मध्ये संपली. दरम्यान, खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करून रासायनिक खताचे उत्पादन केले. खत गुणवत्तेबाबत योग्य उपकरणांची प्रयोगशाळाही तयार केली नाही. सूरगोंडा पाटील यांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्याचा भंग करत विनापरवाना खत उत्पादन करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.