लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतही ऐनवेळी उमेदवारीबाबत धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे नाव निश्चित झाल्यास महायुतीच्या उमेदवारीतही बदल शक्य आहे.त्यातून १९९८ ची पुनरावृत्ती होणार की विद्यमानांना संधी याविषयीची उत्सुकता असेल.
दरम्यान, महायुतीचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलायचा झाल्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ की राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यापैकी कोण? याची उत्सुकता असणार आहे. काम करण्याची पद्धत, जातीय समीकरणे, आर्थिक रसद या सर्वांचा विचार करूनच उमेदवारी दिली जाणार आहे.
लोकसभेच्या १९९८ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून कोल्हापूरमधून दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने त्यावेळी सलग पाचवेळा खासदार असलेल्या उदयसिंगराव गायकवाड यांची उमेदवारी रद्द करून सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी दिली.