खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या दैदिप्यमान विजयाबद्दल त्यांचा तसेच या विजयात मोलाचा वाटा असणारे जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांचा विटा शहराच्या वतीने चोडेश्वरी चौकात आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता. तुमच्याकडे विटा नगरपालिकेची गेली पन्नास वर्षे झाली सत्ता आहे. दहा वर्षे आमदारकी होती, तुम्हाला जे जमलं नाही ते अनिलभाऊंनी करून दाखवलं, विटा शहराचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी होऊन आम्ही काम करतोय. तुम्हाला मिळालेली आमदारकीची दहा वर्षे आणि अनिलभाऊंना मिळालेली दहा वर्षे याची एका व्यासपीठावर येऊन तुलना करूया, असे खुले आव्हान आ. सुहास बाबर यांनी विरोधकांना देत ताकाला जाऊन मोपा लपविण्याचा माझा स्वभाव नाही. त्यामुळे विटा शहराला पुर्वीसारखे समृद्ध करण्यासाठी सर्वांच्या पाठबळावर येणारी विटा नगरपालिकेची निवडणूक जिंकणारच असे सूचक वक्तव्य केलं. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, डॉ. शीतल बाबर, प्रा. सोनिया यावर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. बाबर म्हणाले, गेली ४०- ४५ वर्ष पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची सत्ता आमच्याकडे आहे, असं आम्ही कौतुकाने सांगतो तर विरोधक गेली ४०-४५ वर्ष विटा नगरपालिकेची सत्ता आमच्याकडे आहे असे सांगतात. पण फरक एवढाच आहे की, खानापूर मतदारसंघाला अनिलभाऊंनी पिण्याचेच नाही तर शेतीचे पाणी दिले. मात्र तुमच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत तुम्ही विटा शहराला पुरेसे पिण्याचे पाणी देऊ शकलेला नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. दहा वर्षे आमदारकी तुमच्याकडे होती पण याकाळात तुम्हाला काहीही करता आलेले नाही. ते पुढे म्हणाले की, अनिलभाऊंनी विटा शहरासाठी प्रचंड योगदान दिले. या उलट विरोधकांनी नगरपालिका ओरबडून खाल्ली. विट्यात लवकरच १०० कोटीचे सुमुख उपजिल्हा रुग्णालय उभारणार आहे. बसस्थानकाचे काम सुरू आहे. टेंभ्या सहावा टप्पा पूर्णत्वास येईल. रिंगरोडचा विषय मार्गी लावायचा आहे.
महिन्यातून एकदा नगरपालिकेत जनता दरबार भरवणार असल्याचे आ. बाबर यांनी सांगितले. अमोल बाबर म्हणाले, अनिलभाऊ म्हणायचे पाडव्याला शिमगा व शिमग्याला पाडवा करायचा नसतो, बोलायला अजून वेळ खूप आहे. स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक अमर शितोळे यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा. तेजपाल बुचडे यांनी केले. यावेळी अनिल म. बावर, भालचंद्र कांबळे, विनोद गुळवणी, सूर्यवंशी, अस्लम मुल्ला, विजय राजू मुल्ला, राजू जाधव, रेवण सपकाळ, शहानवाज मुल्ला यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन धीरजकुमार भिंगारदेवे आणि देविदास जाधव यांनी केले. तर आभार श्रीधर जाधव यांनी मानले.