इचलकरंजी येथे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या युवकाचा मृत्यू; तिघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी

सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथील शेखर गायकवाड हा चाकण येथे काम करत होता. त्याचठिकाणी त्याची संशयित सोनल फाटक हिच्याशी ओळख झाली. सहा महिन्यापूर्वी आळंदी येथे दोघांनी विवाहसुध्दा केला. परंतु महिन्यापासून सोनल ही इचलकरंजीत माहेरी रहात होती. पत्नी नांदावयास येत नसल्याने शेखर याने सोनलची आई मंगल आमणे व मामा संतोष फातले यांच्याकडे तगादा लावला होता. त्याच कारणातून शेखरने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ६ मार्च रोजी नातेवाईकाकडून सोनलचा दुसरा विवाह केला जात असल्याची माहिती मिळाल्याने शेखर इचलकरंजीत आला होता.

त्याच्या सांगण्यावरून शिवाजीनगर पोलिसांनी सोनल फाटक हिच्या नातेवाईकांना बोलावून घेतले होते. त्याच दरम्यान शेखर याने पोलिस ठाण्याबाहेर अंगावर पेट्रोल टाकत पेटवून घेतले. अन् जिवाच्या आकांताने तो पोलीस ठाण्यात शिरून सैरभैर पळू लागला होता. पोलिसांनी सतर्कता दाखवत आग विझवत शेखरला तातडीने उपचारासाठी प्रथमत: इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात व त्यानंतर कोल्हापूरातील सिपीआर येथे दाखल केले होते. चार दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. काल मध्यरात्री त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गायकवाड याचा मृत्यूपूर्व जबाबही नोंदवण्यात आला आहे.

त्यामध्ये त्याने पत्नी सोनल ही नांदावयास येत नाही तसेच तिची आई व मामा तिला पाठवत नसल्याच्या कारणावरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे नमुद केल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. तपासामध्ये शेखर गायकवाड याचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. त्याला २ मुले असून घटस्फोट झाला नसतानाही शेखर याच्याशी सोनल हिने दुसरे लग्न केल्याचेही उघड झाले आहे. शेखर याचा संसार उद्ध्वस्त करून त्याला धमकी देऊन दमदाटी, धक्काबुक्की करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची आई हिराबाई अर्जुन गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी सोनल फाटक, मंगल आमणे व संतोष फातले या तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गायकवाड याच्या पार्थिवावर कोल्हापूरात अंत्यसंस्कार करण्यात आले.